नागपूरच्या संघ शिक्षा वर्गात मी वर्गाचा सर्वाधिकारी होतो. झोपण्यापूर्वी सगळीकडे चारी बाजूला एकदा चक्कर टाकून येण्याची माझी सवय होती. जेवढी निवासस्थाने होती, त्या व्यतिरिक्त पाणी, भांडार, रुग्णालय, भोजनालय इ. जेवढी खाती वर्गात असतात त्या सर्व ठिकाणी मी जाऊन पहात असे आणि मगच झोपत असे. एक दिवस मी असाच रात्री फिरत असताना एका कोप¬यातून धूर येताना पाहिला. मी जवळ जाऊन पाहिल्यावर लक्षात आले की, बांबूच्या चटईने तयार केलेल्या भोजन-मंडपाला आग लागलेली आहे. स्वयंपाक झाल्यानंतर धुमसणारी लाकडे विझवून कोप¬यात ठेवली होती. पण लाकडे पूर्ण विझलेली नसल्यामुळे हळूहळू ती पेटत गेली. मी लगेच स्वयंसेवकांना उठवले. स्वयंसेवकांनी पाणी टाकून आग विझवली. सांगण्याचे तात्पर्य हे की, कधीही अग्नीचा अवशेष शिल्लक ठेवता कामा नये.