लोक म्हणतात की, राजसत्ता ही सर्व प्रकारच्या शक्तीचे जणु केंद्र आहे. तीच सैन्याचे नियंत्रण, संचालन करते. आणि म्हणून ती संपूर्ण राष्ट्राची शक्ती आहे. राजसत्तेमध्ये आपल्याला शासनसत्ता दिसते. म्हणूनच आपल्याला शक्ती हवी असेल, तर आपली शासनसत्ता असली पाहिजे असा युक्तीवाद लोक करताना दिसतात. लोकांना आजकाल याचे प्रचंड आकर्षणही आहे. इंग्रजीत मनुष्याला 'रॅशनल ऍनिमल' (विवेकशील प्राणी) असे म्हटले आहे. पण आपल्या हिंदुस्थानचा मनुष्य 'रॅशनल ऍनिमल' नसून तो 'पोलिटिकल ऍनिमल' (राजकीय प्राणी) आहे. जो उठतो तो निवडणुकीची भाषा करतो, राजकीय सत्तेची भाषा करतो. दुसरी भाषाच नाही. दुसरे काही सुचतच नाही. धर्म सुचत नाही, समाज सुचत नाही, देव सुचत नाही. आपल्या सभोवती दारिद्रय ठाण मांडून बसलेले आहे, ते दूर करण्याचे सुचत नाही. आपण असा विचार केला पाहिजे की, जर समाज अवगुणी असेल, दुर्गुणी असेल, तर त्याचे प्रतिनिधी सद़्गुण संपन्न कसे होतील?