दोन शब्द
श्रीगुरुजी (मराठी)   25-Oct-2017
मला लोकमान्य टिळकांचा एक प्रसंग आठवतो. एकदा लोकमान्य टिळक रेल्वेने प्रवास करीत होते. एका स्टेशनवर त्यांना पाहण्यासाठी लोकांची खूप मोठी गर्दी जमली. साहजिकच लोकमान्यांना चार शब्द बोलण्याचा आग्रह झाला. थोडेसे बोलणे या अर्थी 'चार शब्द' असे म्हटले जाते.
 
ते म्हणाले, ''गाडी सुटण्यासाठी केवळ एक-दोन मिनिटेच बाकी आहेत. तेवढया वेळात मी काय बोलू?'' परंतु त्या गर्दीतील प्रमुख मंडळींनी लो. टिळकांना वारंवार खूपच आग्रह केला. ''ठीक आहे'', असे म्हणून लो. टिळकांनी त्या गर्दीला संबोधित करून असे सांगितले की, स्वराज्य मिळवा, काम करा. लोकमान्य टिळकांचे चार शब्दांचेच भाषण पूर्ण झाले. मलाही एके ठिकाणी दोन शब्द बोलण्याविषयी सांगण्यात आले. तेव्हा मी सुध्दा एवढेच सांगितले की, 'काम करा.' कारण आपल्यासमोर जे लक्ष्य आहे ते काही शब्दांनी पुरे होणारे नाही. त्यासाठी निरंतर, सातत्याने परिश्रम करण्याची आवश्यकता आहे.