गतिमान भावात्मक हिंदुत्व
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने श्रेष्ठ आणि अद्वितीय अशा हिंदू जीवनपध्दतीचे पुनरूज्जीवन करण्याच्या कार्याला वाहुन घेतले आहे असे म्हणताक्षणीच काही लोक असा प्रश्न विचारतात की, ''तुमची 'हिंदू' शब्दाची व्याख्या काय आहे ?'' खरेच, ही अवघड गोष्ट आहे. एकदा एका सद्गृहस्थांनी असे म्हटले की, ''मुसलमान किंवा ख्रिश्चन यांची व्याख्या मला करता येईल, पण हिंदूची व्याख्या करता येत नाही.'' त्यांचे म्हणणे बरोबर होते. सूर्य व चंद्र यांची व्याख्या आपल्याला करता येईल, परंतु या सर्व वस्तू ज्यातून उद्भवल्या त्या आदितत्त्वाची व्याख्या करता येणार नाही. पण म्हणून ते आदितत्त्वच अस्तित्वात नाही असे म्हणता येईल काय ? प्रतीकांनी ते व्यक्त करता येत नाही किंवा व्याख्येच्या चौकटीत बसत नाही, एवढयाच कारणामुळे त्याचे अस्तित्व नाकारता येईल काय ? श्रीरामकृष्ण परमहंसांनी म्हटले आहे की, ''केवळ ईश्वर हाच अनुच्छिट, विशुध्द आणि पवित्र आहे, कारण तोच काय तो वर्णनातीत म्हणजेच जिव्हेने अपवित्र न झालेला असा आहे. अन्य प्रत्येक वस्तूची व्याख्या करता येते, परंतु या सर्वव्यापक तत्वाची व्याख्या करता येत नाही.''
 
आपण हिंदू असे मानतो की, ईश्वर हाच आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा आधार आहे आणि बहुधा म्हणूनच हिंदू समाजाचा विकास अशा सर्वसमावेशक रीतीने झाला आहे की, आकार आणि अवस्था या बाबतीत विस्मयजनक विविधता असूनही त्या नानाविध अविष्कारांमध्ये एकत्वाचे एक सूत्र आहे. हिंदू समाजातील सर्व पंथ, नाना जाती यांची व्याख्या करता येईल; परंतु हिंदूची व्याख्या करता येणार नाही. कारण त्या सर्वांचाच समावेश 'हिंदू' मध्ये झालेला आहे. अशी व्याख्या अपुऱ्या ठरल्या आहेत. संपूर्ण सत्य व्यक्त करण्यास त्या असमर्थ आहेत. गेली शेकडो वर्षे वर्धमान व विकसनशील होत असलेल्या आपल्या समाजाबाबात असे होणे अगदी स्वाभाविकही आहे. आपल्या समाजाचा उदय कसा झाला, आपण येथे केव्हापासून सुसंस्कृत जीवन जगत आहोत या संबंधी इतिहासवेत्त्यांना निश्चित अशी काहीही माहिती नाही. एका दृष्टीने आपण अनादी आहोत. ज्याप्रमाणे आदितत्त्वाची व्याख्या करणे अशक्य आहे कारण शब्दसृष्टी त्यानंतरच निर्माण झाली, त्याचप्रमाणे अनादी अशा आपल्या समाजाची व्याख्या करणे हेही अशक्य आहे. ज्या काळी नामाभिधानाची आवश्यकताच नव्हती तेव्हापासून आपले अस्तित्व आहे. आपण एक सुसंस्कृत आणि प्रबुध्द समाज होतो. निसर्गाचे नियम व आत्मतत्त्वाचे गुणधर्म आपणास माहीत होते. एक प्रगत समाजजीवन, थोर संस्कृती आणि अद्वितीय समाजव्यवस्था आपण येथे उभी केली. मानवजातीला उपकारक असणारी प्राय: प्रत्येक गोष्ट आपण प्रत्यक्ष जीवनात उतरविली होती. बाकीची सर्व मानवजात म्हणजे केवळ द्विपाद प्राणी होते. त्यामुळे आपणाला एखादे विशिष्ट नाव देण्यात आलेले नव्हते. आपल्या समाजाचे इतरांहून असलेले वेगळेपण व्यक्त करण्यासाठी आपल्याला प्रबुध्द कार्य म्हणत व उरलेल्यांना म्लेंच्छ म्हणत. पुढे काळाच्या ओघात इतर देशांमध्ये विभिन्न संप्रदाय उदयास आले आणि त्यांचा व आपला संबंध येऊ लागला तेव्हा आपल्या समाजाला काही तरी नाव देण्याची आवश्यकता भासू लागली. एकाच गंगेची ज्याप्रमाणे निरनिराळया ठिकाणी गंगोत्री, भागीरथी, जान्हवी, हुगळी अशी विविध नावे आहेत त्याचप्रमाणे आपल्या या समाजालाही निरनिराळया कालखंडात निरनिराळी नावे दिली गेली. या सर्व नावांपैकी सिंधू नदीवरून प्राप्त झालेले हिंदू हे नाव आपल्या इतिहासात व परंपरेत आपल्याशी इतके प्रदीर्घ काळ निगडित झाले आहे की, आता ते जगमान्य झाले आहे.